HELLO SOLAPUR NEWS | स्वराज्य संग्राम संघटनेच्या युवक आघाडीच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी सागर गायकवाड यांची निवड करण्यात आली आहे. सातारा येथे झालेल्या संघटनेच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीनंतर संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
सातारा येथे झालेल्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीला स्वराज्य संग्राम संघटनेचे अध्यक्ष तानाजीराव शिंदे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे, प्रदेश उपाध्यक्ष अनंतराव देशमुख, प्रदेश सचिव विशाल जाधव यांच्यासह शिवाजीराव पवार, प्रकाश आंब्रे, गंगाधर गायकवाड (सोलापूर) आदी पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी नूतन सोलापूर जिल्हा युवक अध्यक्ष सागर गायकवाड यांचा प्रदेश सरचिटणीस विक्रांत आंब्रे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संघटनेने सोपविलेली जबाबदारी प्रभावीपणे पार पाडण्याचा निर्धार गायकवाड यांनी व्यक्त केला.
विद्यार्थी व युवकांच्या प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्यासोबतच शेतकरी आणि शेतीशी संबंधित विविध प्रश्नांवर आवाज उठविणार असल्याचे सागर गायकवाड यांनी सांगितले. युवकांच्या समस्या, शिक्षण, रोजगार तसेच शेतकरी वर्गाच्या अडचणी शासन दरबारी मांडण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
सोलापूर जिल्ह्यात युवक आघाडीची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्यासाठी तसेच युवकांना संघटनेशी जोडण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
सागर गायकवाड यांच्या निवडीचे सोलापूर जिल्ह्यातील विविध स्तरांतून स्वागत होत असून, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांकडून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.








