HELLO SOLAPUR | सोलापूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कलावती नगर येथे राहणाऱ्या पती-पत्नीच्या आत्महत्येचे कारण समोर आले आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आत्महत्येप्रकरणी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
विषप्राशन करून जीवन संपवण्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमुळे या आत्महत्येमागचे नेमके कारण स्पष्ट झाले आहे. सुसाईड नोटमध्ये कर्नाटकातील विजयपूर येथील अभिषेक कोरे याचे नाव स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. अभिषेक कोरे हा एकतर्फी प्रेमातून श्रीदेवी पाटील यांना वारंवार त्रास देत असल्याचा उल्लेख सुसाईड नोटमध्ये आहे. तसेच बदनामी करण्याची धमकी देत मानसिक छळ करत असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.
सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील अशी आत्महत्या केलेल्या पती-पत्नीची नावे आहेत. दोघांनीही विष प्राशन करून आत्महत्या केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले होते. मात्र घटनास्थळी सापडलेल्या सुसाईड नोटमुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे.
अभिषेक कोरेच्या सततच्या मानसिक त्रासाला कंटाळून आणि समाजात बदनामी होण्याच्या भीतीने दोघांनीही विष प्राशन करून जीवन संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतल्याचे सुसाईड नोटमध्ये नमूद आहे. पत्नीला होत असलेल्या त्रासामुळे संपूर्ण कुटुंब मानसिक तणावाखाली होते, असेही या चिठ्ठीत लिहिल्याची माहिती समोर आली आहे.
या प्रकरणाची गंभीर दखल घेत एमआयडीसी पोलिसांनी विजयपूर येथील अभिषेक कोरे याला ताब्यात घेतले आहे. पोलिसांकडून त्याची कसून चौकशी सुरू असून, सुसाईड नोटमधील आरोपांच्या अनुषंगाने पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे.
दरम्यान, या घटनेमुळे सोलापूर शहरात खळबळ उडाली असून, एकतर्फी प्रेमातून होणाऱ्या मानसिक छळाचे गंभीर परिणाम पुन्हा एकदा समोर आले आहेत. एमआयडीसी पोलीस या प्रकरणाचा सखोल तपास करत असून, सर्व बाबींचा अभ्यास करून पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.









