टीम हॅलो सोलापूर पुणे | युद्घ, दुष्काळ किंवा अन्य कोणत्याही प्रकारची सामाजिक संकटं आली तरी गेल्या शंभर-सव्वाशे वर्षात एकही वर्ष खंड न पडता सतत सुरू असलेला उपक्रम म्हणजे दिवाळी अंक. अन्य कोणत्याही भाषेत दिवाळी अंक प्रकाशित होत नसल्याने ही परंपरा आपण जपली पाहिजे. घटस्थापनेच्या दिवशीच साहित्य चपराक आणि लाडोबाचे दर्जेदार दिवाळी अंक प्रकाशित झाले असल्याने त्यांचे कौतुक वाटते, असे प्रतिपादन माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांनी केले.
चपराक प्रकाशनच्या या दोन्ही दिवाळी अंकाचे प्रकाशन श्रमिक पत्रकार भवनात झाले त्यावेळी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. यावेळी निवेदक सुधीर गाडगीळ, कालनिर्णयचे संचालक जयेंद्र साळगावकर, डॉ. वर्षा तोडमल, सुभाष खुटवड, प्रकाशक घनश्याम पाटील, चंद्रलेखा बेलसरे व्यासपीठावर उपस्थित होते.
भाषा अभिजात झालेली असूनही मराठीचं भवितव्य धोक्यात असल्याचं सांगितलं जात असताना मराठीतलं एक मासिक जगभर जातंय, ग्रामीण भागात पोहोचतंय ही आनंदाची गोष्ट आहे. संपादन ही एक निर्मिती आहे आणि हा निर्मितीची दमछाक करणारा आनंदाचा उत्सव आहे. ही दमछाक मात्र समृद्ध करणारी असते.
साहित्य चपराक आणि लाडोबाच्या दिवाळी अंकातून जाणिवांचा कॅलिडोस्कोप दिसून येतो. विविध विचारधारांचा सामाजिक भान देणारा रिपोर्ताज या अंकातून दिसून येतो. त्यामुळे हे अंक जगभरातील वाचकांच्या पसंतीस उतरले आहेत, असे मत डॉ. वर्षा तोडमल यांनी व्यक्त केले.
जयेंद्र साळगावकर म्हणाले, यावर्षीचा अंक हातात आल्यानंतर ज्यांच्यासाठी लेखकही लगेच पुढच्या वर्षीच्या अंकासाठीचं लेखन सुरू करतात असा साहित्य चपराकचा दिवाळी आहे. फिजी नाचाचा एक छोटा देश आहे आणि तिथेही हा अंक वाचला जातो. अनेकांना याचं महत्त्व कळणार नाही.
गुणात्मक दर्जा अव्वल असल्यानेच मी अनेकांना चपराकचा अंक दिवाळी भेट म्हणून पाठवतो आणि तेही या अंकाच्या प्रेमात पडतात.
सुधीर गाडगीळ म्हणाले, काही जण आपल्याला पहिल्या भेटीतच आवडून जातात आणि त्यांच्या वागण्या-बोलण्यातून मनात रूजतात. घनश्याम पाटील हा असा माझ्या मनात रूजलेला मित्र आहे. यंदाच्या अंकात त्याने आग्रहाने माझ्या आई-वडिलांविषयी लिहून घेतल्याने माझ्या नातेवाईकात माझ्याविषयी प्रेमाचे भरते आले आहे.
लेखकांना असा आनंद मिळवून देणारा हा दिवाळी अंक आहे. मी माझ्या आईवडिलांच्या बारीकसारीक आठवणी या अंकाच्या निमित्ताने आठवल्या.
सु. ल. खुटवड यांनी चपराकच्या लेखनाची, वितरण आणि जाहिरातीच्या कार्यपद्धतीची, समाजमाध्यमांवरील जाहिरातींची काही उदाहरणे सांगितली. आलेलं साहित्य अंकात घुसडायचं अशी पद्धत रूजलेली असताना अतिशय चोखंदळपणे, लेखकांशी संवाद साधत साहित्याची निवड केल्याने या अंकाचे वेगळेपण प्रकर्षाने जाणवते.
अनेक संपादक नवलेखकांना मोडित काढत असताना त्यांनाही प्रोत्साहन देणारे आणि ज्यांचे लेखन घेता येत नाही त्यांना सुधारणेला वाव आहे असे प्रेमाने सांगणारे घनश्याम पाटील कल्पक संपादक आहेत.
प्रिंट, ऑडिओ आणि इ बुक या तिन्ही स्वरूपाबरोबरच संपूर्ण अंकाचा इंग्रजी अनुवाद केल्याने मराठी साहित्य जगभर जाण्यास हातभार लागला आहे, असे मत घनश्याम पाटील यांनी प्रास्ताविकात व्यक्त केले.
कथ्थक विशारद रिना लेले यांनी नृत्याविष्कारातून सादर केलेल्या रामभजनाने कार्यक्रमाचे सुरूवात झाली. सूत्रसंचालन कवी माधव गिर यांनी केले.









