HELLO SOLAPUR | समाजातील माता – भगिनींसाठी अतिशय उपयुक्त उपक्रम राबविणाऱ्या आई प्रतिष्ठानचे कार्य लोककल्याणाचे आहे, असे प्रतिपादन राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण तसेच संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. विडी घरकुल येथे आई प्रतिष्ठानतर्फे सुरू करण्यात आलेल्या मोफत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन बुधवारी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झाले.
याप्रसंगी व्यासपीठावर मंत्री चंद्रकांत पाटील, त्यांच्या धर्मपत्नी अंजली पाटील, प्रिसिजन कॅमशाफ्टचे व्यवस्थापकीय संचालक यतीन शहा, प्रिसिजन फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. सुहासिनी शहा, उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, नगरसेवक प्रथमेश कोठे, स्त्री रोग तज्ञ डॉ. अग्रजा चिटणीस – वरेरकर, वैशाली कबाडे, डॉ. वैशंपायन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. ऋत्विक जयकर, पंचायत समितीचे सदस्य शिवराज पाटील, आई प्रतिष्ठानचे अध्यक्ष मोहन डांगरे, वर्षा डांगरे, सृष्टी डांगरे, निसर्गा डांगरे, योगेश डांगरे, राहुल डांगरे उपस्थित होते.
व्याहाती होमाने कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. प्रारंभी आई प्रतिष्ठानच्या कौशल्य विकास केंद्रातील विद्यार्थिनींनी योग नृत्य सादरीकरण केले.
याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, आई प्रतिष्ठानने काही वर्षांपूर्वी पेरलेल्या कार्यरूपी बीचे आता वटवृक्षात रूपांतर होत आहे. समाजाबद्दल आपली बांधिलकी आहे याची जाणीव ठेवून आई प्रतिष्ठान कार्यरत आहे.
दरमहा हजारो विद्यार्थिनींना लाखो सॅनिटरी नॅपकिन देणे, त्यांच्याकरिता योग, शिलाई, संगणक शिक्षण, आरोग्य शिबिरे अशा कार्यक्रमाचे आयोजन करणे कौतुकास्पद आहे. आगामी काळात सुखदा प्रकल्पांतर्गत गरोदर महिलांची तपासणी, त्यांना पौष्टिक आहार, प्रसुती, प्रसूतीनंतर एक महिन्याचा आहार, आवश्यक शस्त्रक्रिया, रोजगार मोफत देऊन महिलांना भरघोस उत्पन्न मिळण्यासाठी आई प्रतिष्ठानला संपूर्ण सहकार्य करण्यात येईल, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.
आई प्रतिष्ठानच्या मोफत कौशल्य विकास केंद्रात मुलींना योगासनांबरोबरच कपडे, मॅट, पौष्टिक आहारही देण्यात येणार आहे. तसेच या केंद्रात १० संगणक उपलब्ध करून देण्यात आले असून मुलींना मोफत संगणक शिक्षण देखील मिळणार आहे.
त्याचबरोबर या केंद्रात १० शिलाई यंत्रे ठेवण्यात आलेल्या असून या ठिकाणी महिलांना शिलाईचे मोफत प्रशिक्षण देऊन त्यांना स्वावलंबी करण्यात येणार आहे, असेही मंत्री चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी सांगितले. यावेळी मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते मुलींना मोफत कपडे वाटप करण्यात आले.
सृष्टी डांगरे यांनी प्रास्ताविक केले. पंचाक्षरी स्वामी यांनी सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन केले. यावेळी अर्णव डांगरे, बाबू चिप्पा, शुभम चिट्याल, अविनाश शंकू आदी उपस्थित होते.











