SOLAPUR : राज्य सरकारने मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना दिलेले आणखी एक आश्वासन अखेर पूर्ण केले. मुंबईतील आझाद मैदान येथील उपोषण मागे घेण्यापूर्वी राज्य सरकारने जरांगे पाटील यांच्या अटी मान्य केल्या होत्या.
त्यापैकी हैद्राबाद गॅझेट लागू करण्याचा जीआरची मागणी त्याच दिवशी मान्य केल्यानंतर उर्वरित मागण्या टप्प्याटप्प्याने पूर्ण होताना दिसत आहेत.
आज सोलापुर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी माध्यमांना दिली. त्याचबरोबर सोलापूर ग्रामीण मधील देखील गुन्हे मागे घेतल्याची माहिती देण्यात आली.
सोलापूर शहरातील 7 पैकी 7 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. तर सोलापूर ग्रामीणमधील 60 पैकी 49 गुन्हे मागे घेण्यात आले आहेत. सोलापूर ग्रामीण मधील उर्वरित 11 गुन्हे मागे घेण्याची देखील प्रक्रिया सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.
दरम्यान सरकारच्या निर्णयाचे मराठा समाजातील आंदोलकांनी स्वागत केले आहे. त्यामुळे मागील काही वर्षांपासून सोलापुर शहरातील मराठा आंदोलकांवर दाखल झालेले सर्व गुन्हे मागे घेण्यात आले आहेत.
सोलापूर शहरातील मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेतले आहेत. यापूर्वी आम्ही पाच गुणी मागे घेतले होते त्यानंतर नवीन जीआर प्रमाणे समिती गठित करून एकूण सात गुन्हे मागे घेतले आहेत.
– एम. राजकुमार, पोलीस आयुक्त, सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेचे आम्ही मराठा समाजाकडून स्वागत करतो. यामध्ये सरकार आणि पोलीस प्रशासनाचे समाजाच्यावतीने आभार मानतो.
– सोमनाथ राऊत, मराठा आंदोलक आणि पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष, संभाजी ब्रिगेड









