HELLO SOLAPUR NEWS| प्रतिनिधी
सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षात मोठ्या प्रमाणात अंतर्गत हालचाली सुरू असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एकीकडे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील हॉटेल बालाजी सरोवर येथे ठिय्या मांडत संघटनात्मक बैठका आणि पक्षप्रवेशांवर भर दिला आहे, तर दुसरीकडे भाजपचे ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी स्वतंत्रपणे व्यक्तिगत भेटीगाठींवर लक्ष केंद्रित केल्याचे दिसून येत आहे.
याच पार्श्वभूमीवर आज भाजप आमदार सुभाष देशमुख यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या निवासस्थानी भेट देत तब्बल तासभर बंद दाराआड चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. या बैठकीत नेमकी कोणती रणनीती ठरली, याबाबत अधिकृत माहिती जरी समोर आलेली नसली, तरी महापालिका निवडणुकीतील जागावाटप, संभाव्य युती तसेच आगामी राजकीय डावपेचांवर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.
विशेष म्हणजे, एकीकडे भाजपकडून विरोधी पक्षांतील नेत्यांचे पक्षप्रवेश झपाट्याने सुरू असताना, दुसरीकडे पक्षातील दोन्ही देशमुख आमदारांनी अद्याप यावर कोणतीही उघड भूमिका घेतलेली नाही. त्यांच्या मौनामुळे आणि स्वतंत्र बैठकीमुळे राजकीय वर्तुळात विविध तर्कवितर्कांना उधाण आले आहे.
दरम्यान, या दोन्ही आमदारांच्या बैठकीमुळे भाजपची आगामी महापालिका निवडणूक रणनीती नेमकी काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले असून येत्या काही दिवसांत त्याचे स्पष्ट संकेत मिळण्याची शक्यता आहे. सोलापूरच्या राजकारणात सध्या “देशमुख गटात नेमकं काय शिजतंय?” हा प्रश्न चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.











