HELLO SOLAPUR | स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आता जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यामुळे सोलापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीचे आमदार ॲक्टिव्ह मोडवर पाहायला मिळत आहेत.
एकीकडे भाजपचे दोन ज्येष्ठ आमदार सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख हे एकत्रितपणे प्रभागनिहाय बैठका घेताना पाहायला मिळाले. वास्तविक पाहता कधी काळी एकमेकांच्या समोर येणे पसंद न करणारे दोन्ही आमदार आता मात्र एकत्र बैठका घेताना पाहायला मिळत आहेत
तर दुसरीकडे पहिल्यांदाच आमदार झालेले मात्र राजकारणाचा मजबूत वारसा असलेले देवेंद्र कोठे एकटेच गढ लढवताना दिसत आहेत.
नुकताच मुंबईत झालेला धक्कादायक पक्ष प्रवेश सोहळ्यावर आमदार देवेंद्र कोठे यांची छाप स्पष्टपणे दिसून आली. त्यामुळे दोन आमदार जास्त सक्रिय झालेत की काय असा सवाल राजकीय वर्तुळात चर्चिला जात आहे.
नुकतीच महापालिकेची प्रभाग रचना जाहीर झाली आहे. त्यामुळे अनेक प्रभागात बदल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक प्रभागातील समस्या तसेच मतदार यांची मानसिकता वेगळी आहे. त्या जाणून घेण्याच्या दृष्टीने या प्रभागनिहाय बैठका घेत असल्याचे पाहायला मिळत आहे.
याबाबत आमदार सुभाष देशमुख यांनी, आपल्या सोशल मीडियात पोस्ट करत म्हंटले की, आगामी सोलापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नुकतीच प्रभाग रचना जाहीर करण्यात आली आहे.
या अनुषंगाने प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांशी संवाद साधत स्थानिक अडचणी, गरजा आणि विकासाच्या संधी यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यासोबतच, लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहभागातून प्रभागाचा सर्वांगीण विकास साध्य करण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.
तसेच, नवीन प्रभाग रचनेमुळे नागरिकांच्या अडचणी आणि अपेक्षा समजून घेऊन, पुढील नियोजन अधिक लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक होण्यासाठी सर्व स्तरांवर समन्वय राखण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्त करण्यात आला.











