HELLO SOLAPUR AKKALKOT | अक्कलकोट तालुक्यातील कलहिप्परगा गावात गेल्या 7 दिवसांपासून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी आमरण उपोषण सुरू आहे. या उपोषण आता गंभीर स्वरूप धारण केले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे अक्कलकोट तालुका प्रमुख आनंद बुक्कानुरे यांनी शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी हा अन्नत्याग आंदोलनाचा मार्ग अवलंबला आहे.
उपोषणाला सात दिवस उलटून गेले असून त्यांची तब्येत ढासलळी आहे मात्र आनंद बुक्कानुरे यांनी उपचार नाकारले असून उपोषण सुरूच ठेवले आहे.
त्यांच्या तब्येतीत बिघाड झाल्याची माहिती मिळत असून, वैद्यकीय अधिकारी त्यांच्यावर उपचार करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, जोपर्यंत शासन शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करत नाही, तोपर्यंत उपोषण सोडणार नाही, असा ठाम निर्धार बुक्कानुरे यांनी व्यक्त केला आहे.
या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ठाकरे गटाने आक्रमक भूमिका घेतली आहे. अक्कलकोट तालुक्यातील शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने आंदोलन स्थळी दाखल होत आहेत.
शेतकऱ्यांच्या अडचणी आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेवर ठाकरे गटाने तीव्र संताप व्यक्त केला आहे. शिवसेना पदाधिकाऱ्यांनी इशारा दिला आहे की, “जोपर्यंत शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही.”
स्थानिक नागरिक, शेतकरी आणि सामाजिक संघटनांनीही या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. प्रशासनाकडून मात्र अद्याप ठोस प्रतिसाद मिळालेला नाही.
दरम्यान अक्कलकोट तालुक्यातील शेतकऱ्यांच्या न्यायासाठी ठाकरे गटाचे हे आंदोलन आता निर्णायक टप्प्यावर पोहोचले आहे.
शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या :
संपूर्ण शेतकरी कर्जमाफी तातडीने जाहीर करावी
अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची प्रतीहेक्टरी 50 हजार रुपये भरपाई द्यावी
शेतकऱ्यांना योग्य दरात वीज आणि खत पुरवठा करावा
महसूल आणि कृषी विभागाने तातडीने पंचनामे करून मदत वितरित करावी











