HELLO SOLAPUR | ईव्हीएमवर आक्षेप घेत गावात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची मागणी करणाऱ्या मारकडवाडी गावच्या सरपंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावचे सरपंच रणजीत मारकड यांनी भारतीय जनता पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
मारकडवाडीचे सरपंच रणजीत मारकड यांनी विधानसभा निवडणुकीनंतर मारकडवाडीत बॅलेट पेपरवर फेर मतदान घ्यावे अशी मागणी केली होती.
त्यानंतर आज भाजप आमदार गोपीचंद पडळकर, माजी आमदार राम सातपुते यांच्या उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे.
आमदार उत्तम जानकर यांचे कट्टर समर्थक मानले जाणारे मारकडवाडीचे सरपंच रणजित मारकड यांनी भाजपत गेल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
या प्रसंगी बोलताना आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, १९६० नंतर आजपर्यंत कोणत्याही नेत्याने सर्वसामान्य कार्यकर्त्यांना जेवढी ताकद दिली नाही, तेवढी ताकद २०१४ ते २०२५ या काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. तळागाळातील कार्यकर्त्यांना बळ देत विकास थेट जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी केले आहे.
रणजीत मारकड यांचे भारतीय जनता पार्टीत सहर्ष स्वागत असून त्यांच्या माध्यमातून गावाच्या विकासाला निश्चितच गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी माजी आमदार रामभाऊ सातपुते, नागेश वाघमोडे, श्रावण पडळकर, बाळासाहेब बंडगार तसेच सर्व मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.











