HELLO SOLAPUR | सोलापुरात राजकीय वादाला हिंसक वळण लागून एका युवकाचा बळी गेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.
मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे यांची राजकीय वादातून हत्या झाल्याचा आरोप करण्यात येतोय. ही घटना सोलापूर महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 2 क मध्ये घडली.
आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी भाजपच्या दोन गटांमध्ये तीव्र वाद झाला. प्रभाग 2 मधून शालन शिंदे या भाजपच्या अधिकृत उमेदवार आहेत, तर त्यांच्याविरोधात भाजपच्या बंडखोर उमेदवार रेखा सरवदे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
रेखा सरवदे यांनी अर्ज माघारी घ्यावा, यासाठी शंकर शिंदे गटाकडून मोठा दबाव टाकला जात होता. याच कारणावरून शिंदे गट आणि सरवदे गटामध्ये जोरदार वाद झाला.
या वादाला हिंसक वळण लागून भाजप नेते शंकर शिंदे यांच्या कार्यालयाची तोडफोड करण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, हा वाद मिटवण्यासाठी मध्यस्थी करण्यासाठी मनसे विद्यार्थी सेनेचे पदाधिकारी बाळासाहेब सरवदे हे घटनास्थळी गेले होते.
मात्र त्याचवेळी शिंदे गटातील काही लोकांनी बाळासाहेब सरवदे यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाळासाहेब सरवदे यांना तातडीने सोलापूरच्या सहकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.
या संपूर्ण प्रकरणाला राजकीय पार्श्वभूमी असल्याचा आरोप होत असून, प्रभाग 2 मधून भाजप आमदार विजयकुमार देशमुख यांचे पुत्र किरण देशमुख हे देखील निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
भाजपकडून हे संपूर्ण पॅनल बिनविरोध करण्यासाठी मोठा दबाव टाकला जात असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात येतोय.
याच दबावामुळे सरवदे कुटुंबावर भाजप नेत्यांकडून दबाव आणला जात होता, असंही सांगण्यात येतंय. मनसेचे लोकसभा क्षेत्र प्रमुख प्रशांत इंगळे यांनी या घटनेबाबत गंभीर आरोप केले आहेत.
समाजात वाद निर्माण होऊ नये म्हणून बाळासाहेब सरवदे मध्यस्थीसाठी गेले असताना, भाजपच्या शंकर शिंदे गटातील लोकांनीच त्यांची हत्या केल्याचा आरोप प्रशांत इंगळे यांनी केलाय.
या प्रकरणामुळे सोलापूरच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून, शहरात तणावाचं वातावरण आहे.
पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू असून पुढील कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय हत्याकांड घटनाक्रम
बाळासाहेब सरवदे हत्या प्रकरणाचा घटनाक्रम
– प्रभाग क्र. 2 क मध्ये भाजपच्या दोन गटामध्ये हा वाद सुरु होता
– प्रभाग 2 क हा OBC महिलासाठी राखीव आहे.
– या ठिकाणी शालिनी शंकर शिंदे यांना भाजपकडून अधिकृत उमेदवारी देण्यात आली आहे.
– याच ठिकाणी रेखा सरवदे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती,त्या स्वतः भाजपकडून लढण्यास इच्छुक होत्या
– मात्र अपक्ष उमेदवाराने माघार घ्यावी यासाठी रेखा सरवदे यांच्यावर टाकला जातं होता दबाव
– त्यानुसार रेखा सरवदे यांनी अपक्ष उमेदवारी माघार घेतली
– दरम्यान या सर्व वादात रेखा सरवदे यांचे चुलत दीर बाळासाहेब सरवदे यांची हत्या शिंदे गटाकडून करण्यात आली
– बाळासाहेब सरवदे हे मनसेचे पदाधिकारी होते
– दरम्यान भाजपचे सोलापूर उत्तरचे आमदार विजयकुमार देशमुख यांचा मुलगा किरण देशमुख ही प्रभाग 2 ड मधून निवडणूक लढवत आहेत
– हा संपूर्ण प्रभाग 2 बिनविरोध करण्यासाठी विजयकुमार देशमुख गटाकडून प्रयत्न सुरु होता आणि त्यातच मनसेच्या पदाधिकाऱ्याचा बळी गेल्याचा आरोप मनसे पदाधिकारी प्रशांत इंगळे यांनी केला आहे.
– बाळासाहेब सरवदे यांचा खून झाल्याने सरवदे गटाने (हे ही भाजप समर्थकच) भाजपचे माजी नगरसेवक शंकर शिंदे आणि उमेदवार शालन शिंदे यांच्या कार्यालयाची केली तोडफोड
– दरम्यान या हत्याकांडाच्या प्रकरणात 11 संशयित आरोपी असून यातील 4 जणांना जेल रोड पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
– जेल रोड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे










