HELLO SOLAPUR | मोहोळ शहरात छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा विनापरवाना उभारण्यात आल्याचे प्रकरण समोर आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या तक्रारीवरून मोहोळ पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोहोळ एसटी स्टँडसमोरील राष्ट्रीय महामार्गाच्या राखीव जागेत छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा 22 फेब्रुवारी रोजी उभारण्यात आला आहे. मात्र हा पुतळा उभारण्यासाठी कोणतीही अधिकृत परवानगी घेण्यात आलेली नसल्याचा दावा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने केला आहे.
राष्ट्रीय महामार्गाच्या अखत्यारित येणाऱ्या राखीव जागेत कोणतेही बांधकाम अथवा स्मारक उभारण्यासाठी संबंधित यंत्रणांची पूर्वपरवानगी आवश्यक असते. मात्र सदर पुतळा ही परवानगी न घेता अनधिकृतपणे उभारण्यात आल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
या तक्रारीच्या आधारे मोहोळ पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरोधात भारतीय दंड संहितेच्या तसेच संबंधित कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास मोहोळ पोलीस करत आहेत.
दरम्यान, छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याशी संबंधित असल्याने या घटनेचे सामाजिक व राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता असून, कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस प्रशासनाने खबरदारी घेतली आहे.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा मध्यरात्रीच्या सुमारास शंभूप्रेमीनी उभरला आहे. मात्र हा पुतळा नेमका कोणी उभारला याबाबत अद्याप माहिती आलेली नाही.
छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आता हटवण्यात येऊ नये. जर प्रशासनाने तसा प्रयत्न केला तर मोहोळ मध्ये ऐतिहासिक कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल. याला सर्वस्वी प्रशासन जबाबदार असेल अशी भूमिका शंभूप्रेमीनी घेतली आहे.
त्यामुळे पोलिस प्रशासन हे प्रकरण अत्यंत संवेदनशीलपणे हाताळत असल्याचे सांगण्यात आले. पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी, उपविभागीय अधिकारी संकेत देवळेकर, पोलिस निरीक्षक बाजीराव पोवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक किरण पाटील हे तपास करत आहेत.
नागरिकांनी कायदा व सुव्यस्था राखण्याचे आवाहन केले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त लावण्यात आला आहे.











