Hello Solapur News | सोलापूरकरांच्या विश्वासाचे प्रतीक असलेल्या एन्. एम्. वाडिया चॅरिटेबल हॉस्पिटलने गेल्या एका वर्षात आरोग्यसेवेच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. ७४ बेड्सचा आधुनिक आंतररुग्ण विभाग, अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स, डायलिसिस सेंटर, आयसीयू, तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा आणि लवकरच सुरू होणारा कॅथलॅब अशा अनेक सुविधांमुळे वाडिया हॉस्पिटल आता शहरातील सर्वसामान्यांसाठी अत्याधुनिक आरोग्यसेवेचे महत्त्वाचे केंद्र बनत आहे.
या पार्श्वभूमीवर हॉस्पिटलमध्ये शनिवारी आयोजित पत्रकार परिषदेत गेल्या वर्षभरातील विकासकामांची माहिती देण्यात आली. यावेळी पत्रकारांना नव्याने सुरू झालेल्या विविध विभागांची पाहणी करून देण्यात आली.
तीन मजल्यांवर आधुनिक आंतररुग्ण विभाग
सध्या हॉस्पिटलमध्ये तीन मजल्यांवर आंतररुग्ण विभाग सुरू असून ३० बेड्सचे तीन आयसीयू, १२ वातानुकूलित खोल्या, सहा स्पेशल रूम, प्रसूती विभाग, १९ बेड्सचा वॉर्ड आणि कॅज्युअल्टी विभाग कार्यरत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेले प्रशस्त आवार, अत्याधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि प्रशिक्षित नर्सिंग स्टाफमुळे रुग्णांना दर्जेदार सेवा मिळत असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.
६७ तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा
वाडिया हॉस्पिटलमध्ये विविध शाखांतील तब्बल ६७ तज्ज्ञ डॉक्टर सेवा देत आहेत. ऑक्सिजन आणि मेडिकल गॅस पाइपलाइन, अत्याधुनिक मल्टीपॅरा मॉनिटर्स, तीन एक्स-रे मशिन्स, तीन सोनोग्राफी मशिन्स, सात व्हेंटिलेटर्स अशा सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
आठ बेड्सचे आधुनिक डायलिसिस सेंटर
एनएचपीसीएलच्या सहकार्याने आठ बेड्सचे डायलिसिस सेंटर सुरू करण्यात आले असून त्यासाठी फ्रेझेनियस कंपनीच्या अत्याधुनिक डायलिसिस मशिन्स बसविण्यात आल्या आहेत. त्यामुळे मूत्रपिंडाच्या आजारांवरील उपचार अधिक प्रभावीपणे उपलब्ध होणार आहेत.
डी-मार्ट फाउंडेशनच्या मदतीतून चार अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर्स
डी-मार्ट फाउंडेशनच्या आर्थिक सहकार्याने चार आधुनिक ऑपरेशन थिएटर्स आणि सर्जिकल युनिट उभारण्यात आले आहे. या संकुलाचे उद्घाटन रविवारी (२ ऑगस्ट) सायंकाळी ५ वाजता डी-मार्टचे संचालक एन. भास्करन यांच्या हस्ते होणार आहे.
याशिवाय एलआयसी गोल्डन ज्युबिली फाऊंडेशनच्या सहकार्याने जर्मनीहून कार्ल झाईस कंपनीचा अत्याधुनिक ऑपरेटिंग मायक्रोस्कोपही हॉस्पिटलमध्ये दाखल झाला आहे.
लवकरच कॅथलॅब, कार्डिओलॉजी आणि नवजात शिशु आयसीयू
हॉस्पिटलमध्ये कॅथलॅब, अत्याधुनिक कार्डिओलॉजी विभाग आणि नवजात शिशु आयसीयूचे काम अंतिम टप्प्यात असून हे विभाग लवकरच सुरू होणार आहेत. भविष्यात कॅन्सर निदान व उपचारांसाठी स्वतंत्र विभाग सुरू करण्याचीही तयारी सुरू असल्याची माहिती देण्यात आली.
समाजाच्या देणगीतून साकारला विस्तार
वाडिया हॉस्पिटलच्या विस्तारामध्ये समाजातील अनेक दानशूर व्यक्ती, उद्योगसमूह आणि संस्थांचे मोठे योगदान लाभले आहे. वातानुकूलित खोल्या, स्पेशल रूम, आयसीयू, मेडिकल स्टोअर, पेडियाट्रिक विभाग, कॅज्युअल्टी, अॅम्ब्युलन्स, व्हेंटिलेटर, जनरेटर, सोलर युनिट, वॉटर कूलर अशा विविध सुविधा देणगीदारांच्या सहकार्याने उभारण्यात आल्या आहेत. पाच हजार रुपयांपासून ते दहा लाख रुपयांपर्यंतच्या देणग्यांमधून नागरिकांनी हॉस्पिटलवरील विश्वास अधिक दृढ केल्याचे संस्थेने नमूद केले.
सर्वसामान्यांना परवडणारी आधुनिक आरोग्यसेवा हेच ध्येय
हॉस्पिटलचे अध्यक्ष प्रवीणसिन्ह परदेशी यांनी, “समाजाने समाजासाठी उभारलेल्या या हॉस्पिटलमध्ये सर्वसामान्यांना वाजवी दरात सर्वोत्तम उपचार मिळावेत, हीच आमची भूमिका आहे,” असे सांगितले.
तर मानद सचिव शिरीष गोडबोले यांनी, “वाडिया हॉस्पिटल हे भविष्यात सर्व सुविधांनी सुसज्ज, विश्वासार्ह आणि सर्वसामान्यांना परवडणारे आधुनिक आरोग्यसेवा केंद्र म्हणून उभे राहावे, यासाठी संचालक मंडळ, डॉक्टर आणि कर्मचारी सातत्याने प्रयत्नशील आहेत,” असे सांगितले.
पत्रकार परिषदेला हॉस्पिटलचे पदाधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, सेवाव्रती, कर्मचारी तसेच विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.








