HELLO SOLAPUR | सोलापूर शहरात चोरट्यांचा धाडसी कारनामा समोर आला आहे. घरकुल परिसरातील सग्गम नगर भागात चोरट्यांनी थेट एटीएम मशीनच चोरी करून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, चोरट्यांनी चार चाकी वाहनाच्या मदतीने एटीएम मशीनला दोरखंड बांधला आणि मशीन बाहेर ओढून नेत चोरी केली. मध्यरात्रीच्या सुमारास घडलेल्या या प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच MIDC Police Station चे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी एटीएम सेंटरमधील तीन सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याच्या आधारे चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या अनेक घटना समोर येत आहेत. आता थेट बँकेच्या एटीएमवरच चोरट्यांनी हात साफ केल्याने स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
माहिती मिळताच MIDC पोलिसांसह बँकेच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला. एटीएम रूममध्ये दोन सीसीटीव्ही कॅमेरे तर बाहेर एक कॅमेरा असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी सर्व फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, आरोपींचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
दरम्यान, चोरीला गेलेल्या एटीएम मशीनमध्ये नेमकी किती रक्कम होती, याची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही. पोलिस या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
एकीकडे महागाईच्या झळा सामान्य नागरिकांना बसत असताना, दुसरीकडे वाढत्या चोरी आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत आहे. चोरट्यांविरुद्ध कठोर कारवाई करून आरोपींना तातडीने अटक करावी, अशी मागणी स्थानिकांकडून केली जात आहे.











