HELLO SOLAPUR : वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांवर जोरदार टीका केली आहे. सोलापुरात बोलताना त्यांनी सांगितले की, “भाजप आणि त्यांचे सहयोगी पक्ष वगळता इतर कोणत्याही पक्षांशी आम्ही सकारात्मक आहोत, मात्र भाजपसोबत कधीच जाणार नाही.”
– भाजपविरोधी भूमिका कायम : सुजात आंबेडकर
सुजात आंबेडकर म्हणाले, “भाजपविरोधी भूमिका घेतल्यावर अनेकजण आमच्यासोबत येत आहेत. लोकसभेत INDIA आघाडीने आम्हाला सोबत घेतले नाही, त्याचा फटका त्यांनाच विधानसभेला बसला आहे.”
त्यांनी पुढे AIMIM आणि इम्तियाज जलील यांच्याबाबत विचारले असता म्हणाले, “इम्तियाज जलील यांचा काय अनुभव आहे, हे मला ठाऊक नाही. मात्र आम्ही स्पष्टपणे भाजपविरोधी आहोत आणि त्या भूमिकेत ठाम आहोत.”
– संभाजीनगर मोर्च्याबाबत प्रतिक्रिया
संभाजीनगरमध्ये आयोजित वंचित आघाडीच्या मोर्च्याबाबत बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले, “वंचित आघाडी उद्या मोर्चा काढणार आहे. ज्या संघटनेच्या बॅनरवरून गुन्हा दाखल केला, ती संघटना कायदेशीर आहे का, हा प्रश्न आम्ही उपस्थित करतो.”
– संघाबाबत विधान :
संघटनांवर थेट टीका करत सुजात आंबेडकर म्हणाले, “संघ कोणत्या नावाने रजिस्टर आहे? तो कोणत्या नावाखाली निधी गोळा करतो आणि त्याचा स्रोत काय आहे? ही संघटना कायदेशीर आहे का, याचे उत्तर कुणी देणार?”
त्यांनी संघाच्या आर्थिक पारदर्शकतेवरही प्रश्न उपस्थित केला आणि सरकार या विषयावर मौन का बाळगते, असा सवाल केला.
– “चोराच्या घरी मोर्चा काढून काय उपयोग?”
महाविकास आघाडीच्या इलेक्शन कमिशनविरोधातील मोर्च्याबाबत विचारले असता सुजात आंबेडकर म्हणाले,
“मुळात चोराच्या घरी मोर्चा काढून काय उपयोग? इलेक्शन कमिशन स्वतः यात सामील आहे. त्यामुळे ECI वर मोर्चा काढून काहीही होणार नाही.”
त्यांनी पुढे सांगितले की, “प्रकाश आंबेडकर यांनी आधीच 76 लाख मतं वाढली कशी असा सवाल उपस्थित केला होता. पण त्यावेळी कोणीही आमच्या सोबत उभं राहिलं नाही.”
– वंचित आघाडीचा मोर्चा उद्या
वंचित बहुजन आघाडी उद्या संभाजीनगरमध्ये मोठा मोर्चा काढणार असून, विविध सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर सरकारकडे निवेदन दिले जाणार आहे. या मोर्च्यात सुजात आंबेडकर आणि पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत.









