HELLO SOLAPUR | महापालिका स्वीकृत नगरसेवक निवडीत पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मास्टरस्ट्रोक मारल्याची चर्चा सुरू आहे. सर्व समाज घटकांना यामध्ये स्थान देण्यात आले आहे. एकीकडे निष्ठावंत ना संधी देत दुसरीकडे शहरातील भाजपाच्या भविष्यातील निवडणुकीचे गणित मांडल्याचे या निवडीवरून दिसते.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी महापालिका निवडणुकीची सर्व सूत्रे हाती घेतली होती. त्यामुळे पालकमंत्री गोरेंचे योग्य नियोजन आणि शहर भाजपाने घेतलेले परिश्रम यामुळे ऐतिहासिक असा विजय महापालिका निवडणुकीत मिळाला. 102 पैकी तब्बल 87 जागा निवडून आल्या. प्रमुख विरोधी काँग्रेस सह सर्व पक्षांची अक्षरशः वाताहत झाली.
त्यानंतर झालेल्या स्वीकृत नगरसेवक निवडीतही पालकमंत्र्यांनी पॉवरबाज खेळी केल्याचे दिसत आहे. शहराध्यक्ष रोहिणी तळवळकर, ज्ञानेश्वर म्याकल, रुद्रेश बोरामणी, श्रीनिवास दायमा, वृषाली चालुक्य, अक्षय अंजीखाने, ॲड. ऋतुराज मेट्रे यांच्यासोबत महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष मनीष केत यांची निवड केली आहे.
या निवडीनंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असल्या तरी सर्व समाज घटकांना यामध्ये न्याय मिळाल्याचे दिसते. रोहिणी तडवळकर या दोन पिढ्यांपासून भाजपच्या कामात सक्रीय आहेत. वडील जनसंघाचे कार्यकर्ते होते. पती राम तडवळकर यांना आणीबाणीत कारावास भोगावा लागला. तडवळकर या भाजपकडून महापालिकेत विरोधी पक्षनेत्या होत्या. आता भाजपच्या विद्यमान शहराध्यक्ष आहेत.
रुद्रेश बोरामणी यांनी १९९६ पासून भाजपत अनेक पदांवर काम केले आहे. भाजपचे मंडल सरचिटणीस, २००२ मध्ये मनपा शिक्षण मंडळ सदस्य, २००७ मध्ये शहर उपाध्यक्ष. २०१९ मध्ये शहर संघटन सरचिटणीस अशा विविध पदांवर त्यांनी काम केले.
ज्ञानेश्वर म्याकल हे बालपणापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक असून संघाने दिलेल्या विविध कामांची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. धार्मिक, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात ते कार्यरत आहेत. उत्कृष्ट संघटक व नियोजन कौशल्य अशी ओळख आहे. भाजपचे पहिले नगरसेवक निवडून आले तेव्हापासून ते भाजपमध्ये काम करत आहेत.
श्रीनिवास दायमा हे देखील बालपणापासून संघाचे स्वयंसेवक आहेत. १९८५ पासून म्हणजे गेली 40 वर्षे पक्षकार्यात सक्रिय आहेत. वॉर्ड अध्यक्ष ते प्रदेश कार्यकारिणी सदस्यासह अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या. २०१४ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या सभेचे नियोजन केले. आता शहर उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
युवा चेहरा असलेले अक्षय अंजिखाने यांनी २०१४ पासून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून कामास सुरुवात केली. २०१८ मध्ये भाजयुमोच्या मंडल अध्यक्षाची जबाबदारी. २०२० मध्ये भाजयुमो शहर उपाध्यक्ष. त्यानंतर भाजयुमो प्रदेश सचिव. आता भाजपचे मंडल अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.
वृषाली चालुक्य या सोलापूर जिल्हा भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष होत्या. त्या सात वर्षांपासून भाजपच्या सक्रिय सदस्य म्हणून कार्यरत आहेत. महापालिका निवडणुकीच्या प्रचारात चांगली भूमिका पार पाडली. प्रदेश कार्यकारिणी सदस्य आहेत. वरिष्ठ पातळीवरील वरिष्ठ नेत्यांशी त्यांचे चांगले संबंध असल्याने त्या विकास कामांना अधिक निधी आणू शकतील.
ऋषिकेश मेट्रे हे मोची समाजातील उच्चशिक्षित वकील आणि सुशिक्षित युवा कार्यकर्ते आहेत. महापालिका निवडणुकीत पक्षाचे चांगल्या पद्धतीने काम केले. सामाजिक कामामध्ये सक्रिय सहभाग. मोची समाजाचे अनेक प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात.
मनीष केत हे गेल्या पंचवीस वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. शहर आणि जिल्ह्याची त्यांना दांडगी माहिती आहे. महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. सकारात्मक पत्रकारितेसाठी आग्रही, अनेक सामाजिक कामांत आणि पत्रकारांच्या आरोग्याच्या प्रश्नावर काम करतात. माध्यम प्रतिनिधी म्हणून सदस्यपदी त्यांची वर्णी लागली आहे.
शहरात लिंगायत, पद्मशाली, मोची, मराठा आणि व्यापारी असलेल्या मारवाडी समाजाला प्रतिनिधित्व देत भाजपने आगामी निवडणुकांसाठी व्युव्हरचना आत्तापासून सुरू केल्याचे दिसते.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी शहरातील तीनही आमदारांच्या जवळच्या आणि मर्जीतील कार्यकर्त्यांपेक्षा पक्षाला उपयोगी ठरणाऱ्या कार्यकर्ते आणि नेत्यांना संधी देत पॉवरबाज खेळी केल्याचे भाजप मधील कार्यकर्ते बोलून दाखवत आहेत.











