HELLO SOLAPUR | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जे बोलतात ते करून दाखवतात, हा अनुभव सोलापूरकरांनी वेळोवेळी घेतला आहे. उजनी–सोलापूर दुहेरी जलवाहिनी, विमानसेवा आणि आयटी पार्कनंतर आता सोलापूरला पुढची मोठी भेट काय मिळणार, याकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.
10 जानेवारी रोजी हरिभाई देवकरण प्रशालेच्या मैदानावर होणाऱ्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेमुळे सोलापुरात सध्या एकच चर्चा रंगली आहे.
सोलापूरच्या विकासाला नवी दिशा आणि शहराच्या विकासासाठी ठोस निर्णय घेण्याचे काम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. सोलापूर शहराचा पाणीपुरवठा कायमस्वरूपी सुरळीत करण्यासाठी उजनी–सोलापूर दुहेरी जलवाहिनीसाठी तब्बल 892 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटण्याच्या मार्गावर आहे.
विमानसेवेचा शब्द पाळला :
गेल्या 15 वर्षांपासून बंद असलेली सोलापूरची विमानसेवा सुरू करण्याचे आश्वासन देवेंद्र फडणवीस यांनी दिले होते आणि ते प्रत्यक्षात उतरवले. सोलापूर–गोवा विमानसेवा सुरू झाल्यानंतर सोलापूर–मुंबई सेवा देखील कार्यान्वित झाली आहे.
पुढील टप्प्यात सोलापूर–तिरुपती आणि सोलापूर–बेंगळुरू विमानसेवा सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे.
चार महिन्यांत आयटी पार्क :
दहिटणे येथे झालेल्या कार्यक्रमात सोलापुरात आयटी पार्क उभारण्याची घोषणा करण्यात आली आणि अवघ्या चार महिन्यांत जागा निश्चित करून काम सुरू झाले. लवकरच आयटी कंपन्या सोलापुरात दाखल होणार असून, यामुळे हजारो तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत.
10 जानेवारीकडे सर्वांचे लक्ष :
आता 10 जानेवारी रोजी होणाऱ्या सभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरकरांसाठी कोणत्या नव्या घोषणा करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आतापर्यंत केलेल्या प्रत्येक घोषणेला प्रत्यक्ष रूप दिल्यामुळे सोलापूरकरांचा देवेंद्र फडणवीस आणि भाजपवरील विश्वास अधिक दृढ झाला आहे.
पालकमंत्री जयकुमार गोरे यांची महत्त्वाची भूमिका :
या संपूर्ण विकास प्रक्रियेत जिल्ह्याचे पालकमंत्री ना. जयकुमार गोरे हे महत्त्वाचे दुवा ठरले आहेत. त्यांच्या माध्यमातून सोलापूरच्या विकासाचा नवा अध्याय सुरू झाला आहे.
10 जानेवारीच्या सभेसाठी जय्यत तयारी करण्यात आली असून कार्यकर्त्यांचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. सर्वसामान्य सोलापूरकरांच्या मनात एकच अपेक्षा आहे ते म्हणजे देवाभाऊ.
या सभेच्या निमित्ताने सोलापूरच्या विकासाचे नवे पर्व सुरू होणार, अशी ठाम भावना व्यक्त केली जात आहे.











