HELLO SOLAPUR | शिवसेना शिंदे गटाकडून सोलापूरच्या नेत्या, प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांना मोठी संधी मिळाली आहे. मात्र ज्योती वाघमारे नक्की कोण आहेत हे पाहुयात.
कोण आहेत ज्योती वाघमारे :
शिवसेना शिंदे गटाच्या आक्रमक आणि अभ्यासू प्रवक्त्या म्हणून ओळखल्या जाणाऱ्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी आपल्या वक्तृत्व आणि राजकीय भूमिकेमुळे राज्याच्या राजकारणात वेगळी ओळख निर्माण केली आहे.
सामाजिक कार्य, शैक्षणिक क्षेत्र आणि राजकारण अशा विविध क्षेत्रांमध्ये त्यांनी प्रभावीपणे काम केले आहे.
अत्यंत हालाखीच्या परिस्थितीतून पुढे येत प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी उच्च शिक्षण पूर्ण केले.
शिक्षण घेत असतानाच सामाजिक जाणीव जपून त्यांनी समाजकार्याची वाट धरली.
फुले-शाहू-आंबेडकर यांच्या विचारसरणीतून प्रेरणा घेत त्यांनी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय काम केले.
गावोगावी जाऊन छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर व्याख्याने देत समाजप्रबोधनाचे कामही त्यांनी केले.
अनेक कार्यक्रमांमध्ये प्रभावी सूत्रसंचालन करत त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली.
सोलापुरातील वालचंद कॉलेजमध्ये इंग्रजी विषयाच्या CHB लेक्चरर म्हणून त्यांनी अध्यापन केले आहे.
राजकीय कारकिर्दीत सुरुवातीला त्या काँग्रेस पक्षात कार्यरत होत्या.
काँग्रेस महिला आघाडीच्या शहराध्यक्ष म्हणून काम केलं आहे.त्या काळातही त्यांनी सक्रिय आणि झंझावाती कामगिरी केली.
दरम्यान शिवसेना शिंदे गट स्थापन झाल्यानंतर ज्योती वाघमारे यांनी पक्षाची वैचारिक भूमिका ठामपणे मांडण्याची जबाबदारी स्वीकारली.
विविध राजकीय मुद्द्यांवर माध्यमांमधून त्यांनी सातत्याने पक्षाची बाजू मांडली आहे.
विशेष म्हणजे शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देण्यातही त्या आघाडीवर राहिल्या आहेत.
जाहीर सभांमधून उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर त्यांनी जोरदार टीका केली आहे.
आक्रमक आणि अभ्यासू वक्तृत्वामुळे प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या आज शिवसेना शिंदे गटाच्या प्रमुख प्रवक्त्यांपैकी एक म्हणून ओळखल्या जात आहेत.
राजकारणात स्पष्ट भूमिका आणि आक्रमक मांडणी यामुळे प्रा. डॉ. ज्योती वाघमारे यांनी राज्याच्या राजकीय पटलावर आपली वेगळी छाप निर्माण केली आहे.
सध्या राज्याच्या राजकारणात चर्चेत असलेलं नाव म्हणजे शिवसेनेच्या राज्य प्रवक्त्या प्रा. डॉ. ज्योती वाघमारे. सोलापूर जिल्ह्यातील धडाकेबाज महिला कार्यकर्त्या, अभ्यासू वक्त्या आणि आंबेडकरी चळवळीतील सक्रिय चेहरा म्हणून त्यांची ओळख आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात त्यांनी गेल्या अनेक वर्षांत ठसा उमटवला आहे.
शैक्षणिक पार्श्वभूमी :
प्रा. डॉ. ज्योती वाघमारे या उच्चशिक्षित असून त्यांनी इंग्रजी साहित्यात पीएचडी प्राप्त केली आहे. शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणातही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले.
दहावीच्या परीक्षेत ८४% गुण मिळवत उत्तीर्ण
बारावीच्या परीक्षेत पुणे विभागात मागासवर्गीय विद्यार्थ्यांमध्ये प्रथम
अर्धमागधी विषयात राज्यात प्रथम क्रमांक
महिलांच्या प्रश्नांवरील संशोधनासाठी राज्यस्तरीय प्रथम पुरस्कार
१० वर्षांहून अधिक काळ प्राध्यापिका म्हणून अनुभव
पाच भाषांवर प्रभुत्व
डॉ. ज्योती वाघमारे यांना मराठी, हिंदी, इंग्रजी, तेलगू आणि कन्नड या पाच भाषांवर प्रभुत्व आहे. त्यामुळे विविध राज्यांमध्ये व्याख्यानांद्वारे त्यांनी सामाजिक विषयांवर प्रभावी संवाद साधला आहे.
कौटुंबिक आणि सामाजिक पार्श्वभूमी
सोलापूरमधील आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्त्या म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांचे वडील नागनाथ वाघमारे हे दलित पँथरचे कार्यकर्ते होते. कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी त्यांनी हॉटेलमध्ये वेटर तसेच बांधकाम मजूर म्हणून काम केले.
चळवळीतील कामाची दखल घेत सोलापूरच्या नागरिकांनी त्यांना सोलापूर महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून दिले होते.
डॉ. ज्योती वाघमारे यांनी सुरुवातीला मानवी हक्क अभियान, विद्रोही सांस्कृतिक चळवळ आणि आंबेडकरी चळवळ यामधून सामाजिक कामाला सुरुवात केली. काही काळ त्यांनी वृत्त निवेदिका म्हणूनही काम केले.
यानंतर सामाजिक जनजागृतीसाठी त्यांनी महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्र प्रदेश या राज्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा बसवेश्वर यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानं दिली.
त्या काही काळ वालचंद महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणूनही कार्यरत होत्या.
शिवसेनेतील राजकीय प्रवास :
मागील १५ वर्षांपासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉ. ज्योती वाघमारे यांनी एप्रिल २०२३ मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश केला. शिवसेना प्रमुख एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाचा स्वीकार करत त्यांनी पक्षात काम सुरू केले.
यानंतर त्यांना पक्षाने महत्वाच्या जबाबदाऱ्या दिल्या.
शिवसेना राज्य प्रवक्त्या
धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख
मागील काही वर्षांत विविध चर्चासत्रे, टीव्ही डिबेट्स आणि राजकीय मंचांवर त्यांनी शिवसेनेची भूमिका ठामपणे मांडली आहे.
आक्रमक आणि अभ्यासू प्रवक्त्या :
डॉ. ज्योती वाघमारे या आक्रमक पण अभ्यासू वक्त्या म्हणून ओळखल्या जातात. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यांमध्ये केलेली त्यांची भाषणं विशेष चर्चेत राहिली आहेत.
राजकीय विरोधकांवर सडेतोड टीका करताना त्यांनी आदित्य ठाकरे, संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांच्यावरही अनेकदा टीकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्राचा इतिहास, संविधान आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांवर त्यांचा सखोल अभ्यास असल्याचे त्यांच्या भाषणांतून दिसून येते.
थोडक्यात परिचय
पीएचडीधारक उच्चशिक्षित महिला
दलित समाजातील प्रभावी महिला नेतृत्व
सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणारा चेहरा
शिवसेनेच्या आक्रमक प्रवक्त्या
संविधान आणि आंबेडकर विचारांचा अभ्यास
आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता
राजकीय वर्तुळात चर्चेत असलेल्या डॉ. ज्योती वाघमारे या सोलापूरसह पश्चिम महाराष्ट्रात शिवसेनेचा प्रभाव वाढवण्यासाठी महत्वाची भूमिका बजावू शकतात, अशी चर्चा सध्या सुरू आहे.










