HELLO SOLAPUR NEWS | सोलापूर शहरातील ऐतिहासिक आदिला नाल्याचे मूळ अस्तित्व कायम ठेवून विकास आराखड्यातील त्रुटी दूर कराव्यात, या मागणीसाठी नगरसेवक गणेश दादा वानकर यांच्या नेतृत्वाखालील नागरिकांच्या शिष्टमंडळाने Jaykumar Gore यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
शिष्टमंडळाने दिलेल्या निवेदनात आदिला नाला हा शहरातील ऐतिहासिक व नैसर्गिक जलप्रवाह असल्याचे नमूद करण्यात आले. सर्व्हे ऑफ इंडिया नकाशे, महसूल अभिलेख तसेच विविध शासकीय नोंदींमध्ये या नाल्याचा स्पष्ट उल्लेख असूनही नव्या विकास आराखड्यात त्याला नदीचे स्वरूप देण्यात आल्याने मूळ अस्तित्वाबाबत संभ्रम निर्माण झाला आहे.
यामुळे परिसरातील हजारो नागरिकांच्या मालमत्तांवर व हक्कांवर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. निवेदनात UDCPR नियमांनुसार नाल्यालगत आवश्यक असलेल्या संरक्षित पट्ट्याचाही उल्लेख करण्यात आला. आदिला नाल्याचे मूळ स्वरूप कायम ठेवून विकास आराखड्यात आवश्यक दुरुस्ती करण्यात यावी, तसेच नागरिकांच्या मालमत्तांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, अशी मागणी शिष्टमंडळाने केली.
यावेळी आमदार Devendra Kothe यांनी या विषयाची सविस्तर मांडणी करत नागरिकांच्या भावना पालकमंत्र्यांपर्यंत पोहोचवल्या. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन विधान परिषद निवडणूक आचारसंहिता संपल्यानंतर संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन मार्ग काढण्याचे आश्वासन दिले.
या शिष्टमंडळात नगरसेवक गणेश दादा वानकर यांच्यासह मनीष केत, सुभाष पाटील (देगाव), रावसाहेब पाटील (देगाव), राजकुमार अक्कलवाडे, केदार बिराजदार, योगी काटकर, जयवंत सलगर, अक्षय वाकसे, शिवराज झुंजे तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.











